मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीनंतर भाजपनं शिवसेनेला पहिला धक्का दिला आहे. निवडणुकीनंतर स्थायी समितीमध्ये पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजप आमनेसामने आलेले पाहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएमसीच्या शिक्षण विभागासाठी सागवान टेबल आणि खूर्ची खरेदी करण्याचा सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपानं विरोध केला. एवढच नाही तर भाजपच्या प्रस्ताव रेकॉर्ड उपसुचनेला बहुमतानं मंजुरी मिळाली.


गेल्या दशकामध्ये शिवसेनेवर पहिल्यांदाच ही नामुष्की ओढावली आहे. शिवसेनेची इच्छा असूनही बहुमत नसल्यामुळे हा प्रस्ताव पास झाला नाही. भाजपच्या सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा गेल्यानं प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची सेनेवर नामुष्की ओढावली.


मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला ८४ आणि भाजपला ८२ जागा मिळाल्या. कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे अखेर भाजपनं माघार घेतली आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली. या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी भाजपनं कोणतंही पद स्वीकारलं नाही.


मुंबई महापालिकेत आम्ही पहारेकऱ्याची भूमिका पार पाडू असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. यानंतर आता स्थायी समितीच्या बैठकीमध्ये भाजपनं शिवसेनेला हा धक्का दिला आहे.