मुंबई : राष्ट्रवादीचे धोक्याचं वरीस संपले आहे, असे सांगत राष्ट्रवादीला अच्छे दिन येण्याचे संकेत देताना नरेंद्र मोदींची लाट ओसरलेय, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ व्या वर्धापन मेळाव्यात बोलत होते.


कृषी उत्पन्नात घट, बेरोजगारीत वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकार आल्यापासून देशाच्या कृषी उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे निर्यातीवर परिणाम झालाय. यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे. भाजपने दोन वर्षांच्या काळात केवळ जाहिरातबाजी केली. अच्छे दिन येण्याचे स्वप्नच मोदींनी दाखवलेत. प्रत्यक्षात काहीही नाही, अशी टीका पवार यांनी यावेळी केली. 


देशात बदल हवाय म्हणून देशातील लोकांनी भाजपला  सत्ता दिली. परंतु दोन वर्षांत काहीच फरक पडलेला नाही, हे लोकांच्या लक्षात आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला सपशेल नाकारले आहे. अनेक राज्यात भाजपला सत्ता मिळवता आलेली नाही, असे पवार यांनी सांगितले. 


मोदींना इशारा,  विधानसभेत काय झाले? 


लोकसभा निवडणुकावेळी देशात मोदींची लाट आहे, असे सांगितले जात होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असले तरी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला लोकांनी सपशेल नाकारले आहे. दिल्लीत लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा भाजपला मिळाल्या होत्या. विधानसभेत काय झाले?  


देशात विकासाची कामे करण्याऐवजी मोदी केवळ काँग्रेसवर टीका करतात. परदेशात गेल्यानंतर पंतप्रधान हा देशाचा असतो तो कोण्या एका पक्षाचा राहत नाही तरी सुद्धा मोदी काँग्रेवर टीका करतात. परदेशात देशाची निंदानालस्ती करणं गैर, असे पवार यांनी खडे बोल मोदींना सुनावलेत.