मुंबई : व्यंगचित्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, तसेच शिवसेनेचा मराठा मोर्चाच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. एकंदरीत व्यंगचित्र प्रकरणी शिवसेना माफी मागणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच व्यंगचित्राच्या राजकारणामागे काँग्रेस राष्ट्रवादी असल्याचा आरोप शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे मराठे रस्त्यावर आले आहेत, विखे-मुंडे यांनी हे वातावरण पेटवलं असल्याचाही आरोप, सुभाष देसाई यांनी केला आहे.


आघाडी सरकार मागण्यापूर्ण करू शकलं नाही, आघाडीने मराठ्यांना दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही, म्हणून शिवसेनेवर ही आगपाखड सुरू आहे, असं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.


मराठा मोर्चाबाबत शिवसेनेचं मुखपत्र सामना दैनिकात छापून आलेल्या कार्टुनवर शिवसेना आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती, यावर शिवसेनेच्या काही आमदारांची बैठक देखील झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीनंतर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यंगचित्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं म्हटलं आहे.


दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने नवी मुंबई आणि ठाण्यातील सामना दैनिकाच्या कार्यालयावरील हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे, आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.