मुंबई : खुद्द राज्याचे ग्रुहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अतिक्रमण करुन घेतलेली जमीन अजूनही परत केली नसल्याचा आरोप, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे. या प्रकरणात गृहनिर्माण राज्यमंत्री वायकरांवर म्हाडा आणि मुंबई महानगरपालिका कारवाई कशी करणार, असा सवालही यावेळी संजय निरुपम यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचं, निरुपम यांनी सांगितलं. तर रवींद्र वायकरांनी निरुपम यांचे सर्व आरोप फेटाळलेत. सर्व आरोप राजकीय आकसापोटी करण्यात येत असल्याचा पलटवार वायकर यांनी केला आहे. 


फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांमागचं आरोपांचं सत्र थांबता थांबत नाहीये... विनोद तावडे, पंकजा मुंडेंपासून ते खडसेंपर्यंत भाजपचे अनेक मंत्री वादात अडकल्यानंतर आता शिवसेनेचा नंबर आहे... आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यानंतर आता गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकरांवर काँग्रेसनं आरोप केले आहेत.
भाजपच्या मंत्र्यांवर आणि खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांवर होत असलेल्या भूखंड लाटण्याच्या आरोपांनंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यांचा नंबर लागलाय. गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आरे कॉलनीमध्ये व्यायामशाळेचं अवैध बांधकाम केल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.


2012-13 साली वायकरांनी आदिवासींसाठी व्यायामशाळा आणि सोना बाथ उभारण्यासाठी परवानगी मागितली. त्यांना साडेतीन हजार चौरस फुटांचं केवळ तळमजल्याचं बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात तिथं दुमजली बांधकाम करण्यात आलंय. याचा अर्थ परवानगीपेक्षा दुप्पट बांधकाम केलं गेलंय. या व्यायामशाळेची देखभाल नोंदणीकृत संस्थेकडून होणं अपेक्षित असताना शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्था, या बिगर नोंदणीकृत संस्थेकडे हे काम दिल्याचा निरुपम यांचा आरोप आहे. या संस्थेवर वायकरांचे कुटुंबियच सदस्य आहेत. या व्यायामशाळेचा परिसर कुंपण टाकून बळकावण्यात आल्याचंही निरुपम यांनी म्हटलंय. 


निरुपम या प्रकरणाची तक्रार आता थेट मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. खडसेंसारख्या हाय प्रोफाईल मंत्र्याला आरोपांमध्ये बाहेरचा रस्ता दाखवणं फडणवीसांना जमलं असलं, तरी मित्रपक्षाचे राज्यमंत्री असलेल्या वायकरांबाबत आता त्यांचं काय धोरण असणार, शिवसेना नेतृत्वही वायकरांना पाठीशी घालणार का, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.