हिंदुंचे सण रोखण्याचा प्रयत्न हाणून पाडणार - शिवसेना
हिंदूंचे सण-उत्सव रोखण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शिवसेना नागरिकांच्या असंतोषाचे नेतृत्व करेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
मुंबई : हिंदूंचे सण-उत्सव रोखण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शिवसेना नागरिकांच्या असंतोषाचे नेतृत्व करेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
दहिहंडीच्या उंचीच्या मुद्यावर शिवसेनेने भाजपसह मनसेलाही मागे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दहीहंडीच्या मनोऱ्यांना न्यायालयाने नियंत्रणाखाली आणलं आहे. यावर आता मनसेपाठोपाठ आता शिवसेनेनेही इशारे देण्यास सुरुवात केली आहे.
'गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आदी आमच्या श्रद्धेचे विषय आहेत, राज्यकारभार करणाऱ्या न्यायालयांनी निदान या बाबतीत तरी लक्ष्मणरेषा ओलांडू नये, असा सूचक इशारा सामनातून उद्धव ठाकरे यांनी दिला आहे
शिवसेनेचे मुखपत्र सामनाने म्हटलंय, लोकांनी त्यांचे सरकार लोकशाही पद्धतीने निवडून दिले आहे. त्यांना काम करू द्या. भलेबुरे कळण्याइतपत डोके सरकारच्या मानेवर आहे. हे डोके उडवून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केलाच, तर राष्ट्रीय व्यवस्थेचे सर्व थर कोसळतील, असंही या माध्यमातून उद्धव यांनी म्हटले आहे.
मनसेचा अजेंडा हिसकावून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने म्हटले आहे, 'हिंदूंचे सण-उत्सव होणारच. ते रोखण्याचा प्रयत्न नागरिकच हाणून पाडतील आणि शिवसेना त्या असंतोषाचे नेतृत्व करेल'.
न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वप्रथम मनसेने उघड भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेलाही हिंदू सणांचा अजेंडा घ्यावा लागला आहे. न्यायालयाने दहीहंडीच्या थरांवर, बालगोविंदांच्या सहभागावर वयाची मर्यादा आणली गेली आहे. यावर मुंबईतील गोविंदा पथकांत नाराजी आहे.