मुंबई : आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिका-यांची राज्यव्यापी बैठक बुधवारी मुंबईत होते आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लोकप्रतिनधी आणि पदाधिका-यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिका मुख्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरणावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली हातमिळवणी मनापासून होती की फक्त फोटोपुरतीच, हे लवकरच स्पष्ट होईल. पण आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं युतीत पुढे काय वाढून ठेवलंय याचा अंदाज आपल्याला बुधवारी मुंबईत होणा-या शिवसेनेच्या कार्यक्रमातून बांधता येऊ शकेल. आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या दृष्टीनं शिवसेनेची पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची राज्यव्यापी बैठक वांद्रे पूर्व येथील रंगशारदा सभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे लक्ष असणार आहे.


महापालिका निवडणूकीत युती व्हावी अशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. मात्र त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी भाजपच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारा आडून भाजपनं शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवातही केली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते स्वबळाची भाषा करत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेची ही राज्यव्यापी बैठक चांगलीच गाजणार याबाबत शंका नाही. रंगशारदा सभागृह त्यासाठी सज्ज झाला आहे.