मारहाणविरोधात राज्यातील डॉक्टरांचे आंदोलन, मुंबईत सामूहिक रजेवर
शहरातील सायन, केईएम आणि नायर रुग्णालयातले डॉक्टर्स संपावर आहेत. सायन हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री मृत पेंशटच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरला मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ डॉक्टर्सनी कामबंद आंदोलन सुरू केलंय.
मुंबई : शहरातील सायन, केईएम आणि नायर रुग्णालयातले डॉक्टर्स संपावर आहेत. सायन हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री मृत पेंशटच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरला मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ डॉक्टर्सनी कामबंद आंदोलन सुरू केलंय.
रेखा सिंग या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी सेवेवर असलेल्या निवासी डॉक्टरांना मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एकत्र जमून कँडल मार्च काढला. रिक्त असलेल्या सुरक्षा रक्षकाची पदे त्वरित भरली जावीत आणि डॉक्टरांना पूर्ण सुरक्षा मिळावी अशी मागणी डॉक्टर संघटनेने केलीये.
दरम्यान या मारहाण प्रकरणाचे पडसाद मु्ंबईतील इतर रुग्णालयातही उमटले. सायन हॉस्पिटल, केईएम, नायर हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरु केलं. रविवारी रात्री 8 पासून हे कामबंद पुकारण्यात आलंय. त्यामुळे इथं येणा-या रुग्णांचे हाल होतायत.
तर औरंगाबादमधील घाटी शासकीय रूग्णालयात प्लास्टर बदलण्यावरून डॉक्टर आणि रूग्णाच्या नातेवाईकांसोबत धक्काबुक्की झाली. रविवारी रात्री ही घटना झाली. डॉक्टर उमेश काकडे आणि विवेक बडगे यांना किरकोळ मारहाण करण्यात आलीय. रूग्णांचे नातेवाईकांनी दारु पिऊन धुडगूस घातल्याचा डॉक्टरांचा आरोप आहे. औरंगाबाद येथील बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.