मान्सूनच्या अंदाजाने भारतीय शेअर बाजारांत पुन्हा उत्साह
मान्सूनच्या ताज्या अंदाजानं भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा उत्साह संचारलाय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांच्या आसपास झुलणाऱ्या सेन्सेक्सनं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठलाय.
मुंबई : मान्सूनच्या ताज्या अंदाजानं भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा उत्साह संचारलाय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांच्या आसपास झुलणाऱ्या सेन्सेक्सनं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठलाय.
आज दिवसअखेर सेन्सेक्स 30,248 अंशांवर बंद झालाय. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही 9 हजार 400 अंशांचा महत्त्वाचा टप्पा पार केलाय. आज निफ्टी 9,407 अंशांवर बंद झाला. चांगल्या मान्सूनमुळे येत्या काळात ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी बघायला मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे दोन दिवसांपासून सातत्यानं पडणाऱ्या टेलिकॉम क्षेत्रातही आज चांगली खरेदी बघायला मिळाली. रिलायन्स, ओएनजीसी या तेल कंपन्यांच्या समभागातही चांगली वाढ झाली.
हवामान विभागाचा अंदाज
भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवले आहे. अवघ्या चार दिवसात अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनासची शक्यता निर्माण झालीय.
हवामान खात्याच्या नव्या डायनामिक पद्धतीनं अंदाज वर्तवणाऱ्या मॉडलनुसार येत्या अवघ्या चार दिवसात अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनासची शक्यता निर्माण झालीय. त्यासाठी पोषक हवामान तयार होतंय. नैऋत्य मोसमी मान्सून सामान्यपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंदमान निकोबारमध्ये दाखल होतो. यंदा त्या आगमानसाठी अत्यंत पोषक हवामान तयार झालंय.
उत्तर आणि पश्चिम भारतात वाढणारं तापमान. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान पडलेला अवकाळी पाऊस, पूर्व किना-यावर झालेली च्रकी वादळासारखी परिस्थिती हे सगळे वातावरणीय बदल मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असल्याच नव्या डायनामिक मॉडेल द्वारे स्पष्ट होतंय.
सरासरीच्या 96 टक्के पाऊस
याआधीच्या भविष्यवाणीत हवामान खात्यानं सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. पण गेल्या काही दिवसात मान्सूनसाठी घातक असणाऱ्या एल निनोचा प्रभाव कमी होत चाललाय. त्यामुळे यंदा मान्सून दीर्घकालीन सरासरी इतकाच बरसेल असा सुधारित अंदाज वर्तवण्यात आलाय.
दरम्यान सरासरीपेक्षा अधिक मान्सून होण्याची शक्यता नसल्याचंही हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. 94 ते 104 टक्के पाऊस पडला तर सरासरी इतकाच मानला जातो. यंदा पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या एल निनोचा मान्सूनवर होणारा परिणाम अत्यल्प असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.