महापौर निवडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मानले मुंबईकरांचे आभार
महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जाऊन महापौर, उपमहापौरांचं अभिनंदन केलं.
मुंबई : महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जाऊन महापौर, उपमहापौरांचं अभिनंदन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या बाहेर छोटेखानी विजयी सभा घेतली. यात त्यांनी मुंबईकरांचे आभार मानले.
त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेही उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना घेऊन ते हुतात्मा चौकात गेले. हुतात्मा चौकात सर्वांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.
मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकला. मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड झाली आहे. त्यांना शिवसेना आणि भाजपची एकूण १७१ मते पडली. महाडेश्वर यांनी काँग्रेसच्या विठ्ठल लोकरे यांचा पराभव केला. लोकरे यांना अवघी ३१ मते मिळाली.
मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या निवडणूक प्रक्रियेला आज दुपारी १२ च्या सुमारास सुरुवात झाली. भाजपने कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता स्थापन होईल, हे निश्चित झाले होते.
शिवसेनेचे ८४ आणि अपक्ष ४ आणि भाजपचे ८२ आणि इतर २ अशा एकूण १७१ जणांनी विश्वनाथ महाड़ेश्वर यांच्या बाजुने मतदान केले. तर काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना ३१ मते मिळाली.