मुंबई : पालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर पुन्हा एकदा नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे. आम्ही शिवरायांच्यासमोर झुकणारे आहोत इतर कोणाहीसमोर झुकणार नाही, असे सांगत शिवराय संचलन ही आमची परंपरा आहे. फक्त निवडणुकीच्या काळात आठवण काढणारे आम्ही नाही, असाही चिमटा भाजपला काढला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनाप्रणित स्थानीय लोकाधिकार समितीच्यावतीने फोर्ट परिसरात आयोजित शिवराय संचलनाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेशवर, उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्यासह मंत्री, आमदार आणि शिवसैनिक उपस्थित. त्यावेळी ते बोलत होते.


सलग पाचव्यांदा विजयी झालो आहोत. यावेळेचा विजय मागच्या चार वेळा मिळालेल्या विजयापेक्षा नक्कीच वेगळा होता. निवडणूक असो वा नसो, आमच्या हातात भगवाच राहणार. दुसरा कुठलाही पक्ष नको, झेंडा नको. आम्ही शिवरायांच्यासमोर झुकणारे इतर कोणाहीसमोर झुकणार नाही. एकमेकांवर जे काय फेकफेकी करायची ते झाले आहे. होळी, धुळवड, रंगपंचमी जे काय व्हायचं ते झाले आहे, असे उद्धव म्हणालेत.


केंद्र सरकारमध्ये दोन लाखापेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध होणार आहे आहे. यासाठी मला लोकाधिकाराची गरज लागणार आहे. तिथे कोणत्या पात्रतेच्या मुलं-मुली हव्या आहेत ते लोकाधिकारच्या माध्यमातून आपल्याला पाहावे लागेल. तिथे आपल्या मुला - मुलींना जास्तीतजास्त नोकऱ्या लागल्या पाहिजेत, असे सांगत भाजपला एक प्रकारे इशारा दिला आहे.