मुंबई : विरार येथे राहणाऱ्या एका २७ वर्षीय मुलीचे १५ मे रोजी अपहरण झाले होते. अपहरण कर्त्यांनी तिचा खून केला. नोकरीसाठी दिलेले पैस परत मिळत नसल्यामुळे तिघाजणांनी एका तरुणीचं अपहरण करुन तिचा निर्दयीपणे खून केल्याचं उघड झालं. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते  पोलिसांनी जाळ्यात अडकले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुरख्या आड चेहरा लपलेल्या आरोपींना खून प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. मोहितकुमार, शिव शर्मा आणि राम अवतार शर्मा अशी या नराधमांची नावं आहेत. या आरोपींनी अत्यंत नियोजन बद्ध पद्धतीने कविता कोठारीचा खून करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विरारच्या किशोर कुंज सोसायटीत राहणारी कविता कोठारी रविवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडली, त्यानंतर ती घरी परतलीच नाही. ती  रत्नम इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टीम लीडर म्हणून कामाला होती. कविता घरी परत न आल्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्याच दिवशी संध्याकाळी किसनलाल कोठारी यांना खंडणीसाठी फोन आला.



किसनलाल यांना आलेल्या खंडणीच्या फोनवरून पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बोईसरमधून अटक केली. पोलीस चौकशीत आरोपींनी जे माहिती दिली ती मोठी धक्कादायक होती...कविताची हत्या करुन आरोपींनी तिचा मृतदेह  वाणगावच्या हद्दीत जाळून पुरावा नष्ट करण्याचाप्रयत्न केला होता.


कविताची हत्या ही अवघ्या १७ हजार रुपयांसाठी करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघङ झालं. आरोपींनी नोकरीसाठी कविताला १७ हजार रुपये दिले होते. ते पैसे कविता परत देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे अपहरण करुन आरोपींनी तिचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी या तीन आरोपीसह एका महिलेला अटक केली आहे.