मुंबई : ईडीने  मद्यसम्राट विजय मल्ल्या यांची ६  हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरू केली आहे. कर चुकवेगिरीसह कर्ज गैरव्यवहारप्रकरणी मल्ल्या यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. मल्यांच्या मालमत्तांची माहिती ईडीने जमा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्ल्या यांच्या मालमत्तेत त्यांचे समभाग, स्थावर आणि जंगम मालमत्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता यांचा समावेश आहे. या प्रकरणात नाव आलेल्या अन्य आरोपींची मालमत्ताही जप्त करण्यात येणार आहे. याबाबत ईडीने बॅंका आणि वित्तीय संस्थांना याची माहिती जमा करण्यास सांगितले आहे.


काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मल्ल्या यांची मालमत्ता जप्त करण्याची दुसरी फेरी ईडीकडून सुरू होणार आहे. मल्ल्या हे न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत, त्यांच्याविरुद्ध अनेक वॉरंट बजावण्यात आले आहेत. 


ईडीने काही महिन्यांपूर्वी मल्ल्या यांची १  हजार ४११ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. विशेष न्यायालयाकडून मल्ल्या फरारी असल्याचा आदेश मिळविण्याचे प्रयत्न ईडीकडून सुरू आहेत. 


या आदेशानंतर परराष्ट्र मंत्रालयामार्फत ब्रिटनची या तपासात मदत घेऊन मल्ल्या यांना भारतात परत आणणे शक्‍य होणार आहे. याआधीच ईडीने भारत- ब्रिटन यांच्यातील कराराप्रमाणे मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.