मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येदेखील वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापरण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे; परंतु त्याबाबतच्या सर्वंकष विचारविनिमयानंतर आगामी निवडणुकांमध्ये त्याच्या वापराबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयोगाच्या कार्यालयात मान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी मतदान केल्याची पावती 
दर्शविणाऱ्या यंत्रांचे उपस्थित प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखविले. 


 



 सहारिया यांनी सांगितले की, मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्रामुळे कोणाला मतदान केले याची मतदाराला खात्री करता येते. भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर राज्य निवडणूक आयोग विचार करीत आहे; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतात. त्या अनुषंगाने या यंत्रात बदल करण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविण्यात आले होते. त्यांनी आवश्यकतेनुसार प्राथमिक स्वरूपात हे यंत्र तयार केले आहे. त्याचेच प्रात्यक्षिक आज दाखविण्यात आले.