`केईएम` जपतंय अरुणाच्या स्मृती!
अरूणा शानबागचा आज पहिला स्मृतीदिन ... ४२ वर्षे अंथरूणावर खिळून राहिलेल्या अरूणाचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि केईएम रूग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक सामान्यजनही आकंठ दु;खात बुडाले. अरूणाच्या निमित्ताने इच्छामरणाचा मुद्दाही देशात विशेष चर्चेला आला. केईएम रूग्णालयातील कर्मचारी विशेषत; परिचारीका अजूनही तिच्या आठवणी जपतायत.
कृष्णात पाटील, मुंबई : अरूणा शानबागचा आज पहिला स्मृतीदिन ... ४२ वर्षे अंथरूणावर खिळून राहिलेल्या अरूणाचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि केईएम रूग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक सामान्यजनही आकंठ दु;खात बुडाले. अरूणाच्या निमित्ताने इच्छामरणाचा मुद्दाही देशात विशेष चर्चेला आला. केईएम रूग्णालयातील कर्मचारी विशेषत; परिचारीका अजूनही तिच्या आठवणी जपतायत.
... ती ४२ वर्ष!
केईएम रूग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या अरूणा शानबागवर तिथंच काम करणाऱ्या सोहनलालने १९७२ मध्ये लैंगिक अत्याचार करत हल्ला केला आणि त्यानंतर ती कोमात गेली. केईएमच्या परिचारिकांनी मात्र ४२ वर्षे तिची मनोभावे सेवा केली. कुटुंबातील सदस्याप्रमाणे तिला सांभाळलं.
जिम आणि लायब्ररी
बोलत नसली तरी ती सर्वांची झाली होती. वर्षभरापूर्वी ती मरण पावल्यानंतर परिचारिकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक पोकळी निर्माण झाली, जी अजूनही भरून निघालेली नाही. तिच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न सध्या केईएम करत आहे. तिच्या स्मरणार्थ जिमचे ओपनिंग केलं जातंय, तर आगामी काळात लायब्ररीही उघडली जाणार आहे, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे डीन डॉ अविनाश सुपे यांनी दिलीय.
सेवा सप्ताहाचं आयोजन
अरूणा शानबागच्या निमित्तानं इथल्या परिचारीकांनी शुश्रृषाला, त्यांच्या सेवेला एका वेगळ्या पातळीवर नेवून ठेवलं. ज्याचा गौरव जगभरातून झाला. शिकावू परिचारिकांसाठी अरूणा शानबागची सेवा म्हणजे एक परिपाठच असे... अरूणाचे सर्वाधिक जवळकीचे नाते होते परिचारिकांसोबत... त्यामुळं या तिच्या पहिल्या स्मृतीदिनी तिची खरी उणीव परिचारिकांनाच भासत आहे. म्हणूनच तिच्या स्मृती दिनानिमित्त या वर्षीपासून परिचारिकांनी सेवा सप्ताहाचे आयोजन केलंय.
सध्याच्या जमान्यात रक्ताची नाती सैल होता असताना केईएममध्ये मात्र एक आत्मियतेचं आणि मानवतेचं नातं घट्ट झालं होतं.