नवी मुंबई : टोलमधून सूट मिळावी म्हणून एका उच्चशिक्षित तरुणाने चक्क केंद्रीय मंत्रालयाचे बनावट ओळखपत्र बनवून तसेच स्वतःच्या होंडा सिटी कारमध्ये लाल दिवा बसवल्याची घटना उघडकीस आलीये. विवेक पीपल (२६) असे या तरुणाचे नाव असून वाशी पोलिसांनी त्याला फसवणूक तसेच बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी अटक केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली आई केंद्रात कॅबिनेट सेक्रेटरी तर आजोबा राजस्थानचे कॅबिनेट मंत्री असल्याचे सांगणाऱ्या या भामटया तरुणाकडे परराष्ट्र मंत्रालयाची बनावट लेटरहेडसुध्दा सापडली आहेत. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर टोल भरावा लागू नये यासाठी त्याने हा प्रताप केल्याचे कबूल केले आहे.


एका अॅपल मोबाईलच्या चोरी प्रकरणात पोलिसांच्या हाती लागलेला विवेक पीपल हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे आणखी कुणाची फसवणूक केली आहे का, याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असल्याची माहिती वाशी पोलिसांनी दिली आहे.


विवेक पनवेलमध्ये राहात असून त्याने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेले आहे. विवेकचे वडील ओएनजीसीमध्ये कामाला असून गेल्या दोन महिन्यापासून तो आपल्या वडिलांची होंडा सिटी कार घेऊन मिरवत होता. विशेष म्हणजे त्याने आपल्या कारमधील दर्शनी भागामध्ये लाल दिवा ठेवला होता. कुणी लाल दिव्याबाबत त्याच्याकडे विचारणा केल्यास त्यांना तो आपली आई केंद्रात कॅबिनेट सेक्रेटरी तर आजोबा राजस्थानचे कॅबिनेट मंत्री असल्याचे सांगत होता.


त्याशिवाय त्याने भारत सरकारकडून दिले जाणारे व्हीआयपी अॅथोरिटी या नावाने आपले बनावट ओळखपत्र देखील बनवून घेतले होते. ओळखपत्रावर भारत सरकारचे बोधचिन्ह व संसदभवनाचे चिन्ह असल्याने त्याचा वापर करुन तो गेल्या दोन महिन्यापासून मुंबईसह नवी मुंबई व इतर भागात बिनधास्त वावरत होता.


दरम्यान, वाशीतील यश गुप्ता नामक तरुणाचा चोरीला गेलेला अॅपल कंपनीचा मोबाईल गेल्या आठवड्यात विवेक पीपल याच्या हाती लागला होता. यश गुप्ता याने विवेकशी संपर्क साधला असता, विवेक पीपल याने सेंट्रल मिनिस्ट्रीचा रुबाब दाखवत यश गुप्ता याला उडवा-उडवीची उत्तरे दिली. तसेच त्याला शिवीगाळ देखील केली.


त्यामुळे यशने वाशी पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक इज्जपवार यांनी विवेक पीपल याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने आई केंद्रात कॅबिनेट सेक्रेटरी तर आजोबा राजस्थानचे कॅबिनेट मंत्री असल्याचे सांगून  पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने टोल टॅक्स लागू नये यासाठी हा प्रताप केल्याचे कबुल केले.