पोलीस भरतीसाठी मोफत ट्रेनिंग
राज्यातल्या पोलीस भरतीच्या जाहिरातीनंतर तरुणाई तयारीला लागलीय.
अकोला: राज्यातल्या पोलीस भरतीच्या जाहिरातीनंतर तरुणाई तयारीला लागलीय. पण ग्रामीण भागातल्या तरुणाईला मोफत आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासाठी एक पोलीस अधिकारीच पुढे आला आहे.
अकोल्यातल्या पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे हे पोलिसांमध्ये भरती होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना मोफत ट्रेनिंग देत आहेत. पातूर शहरातल्या नगर परिषद मैदानावर हे ट्रेनिंग दिलं जातं.
शंभर पेक्षा जास्त तरुण-तरुणी या प्रशिक्षणाचा फायदा घेत आहेत. तसंच दर रविवारी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये लेखी परीक्षाही घेतली जाते.
पोलीस भरतीच्या ट्रेनिंगसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मोजावे लागतात, ग्रामीण भागातल्या तरुणांना हे शक्य होईलच असं नाही. त्यामुळे अनिल जुमळेंनी हे समाजकार्य करायचा निर्णय घेतला. कमीत कमी शंभर विद्यार्थ्यांना पोलीस आणि सैन्यदलात पाठवण्याचं जुमळेंचं लक्ष्य आहे.