प्रशांत परदेशी, धुळे : रुग्णाच्या अनेक अवघड शस्त्रक्रिया अलगद आणि सहज करणारे धुळ्याचे भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांना केंद्रीय मंत्री मंडळात संधी मिळाली. त्यांच्या निवडीमागची गणितं काय आहेत, पाहुयात... 


सुभाष भामरेंचं व्यक्तिमत्व 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभ्यासू, चिकाटी, मितभाषी, स्वच्छ चरित्र, शालिन अशी धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांची ओळख... भामरे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काँग्रेसची असली तरी भाजपवासी झाल्यापासून ते पक्षाशी एकनिष्ठ राहिलेत. त्याचंच बक्षीस म्हणून आता डॉ. भामरे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागलीय. 


इतर कारणं... 


भाजपकडून केंद्रात डॉ. भामरे यांच्या वर्णीमागे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांशिवाय जातीय समीकरणं आणि प्रादेशिक समतोल ही कारणंही आहे. केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळात खानदेशला संधी मिळालेली नाही. त्यातच एकनाथ खडसे यांच्या गच्छंतीमुळे बहुजन नेते भाजपला चालत नाही, अशी ओरड उठली होती. त्यामुळंच बहुजन समाजाचा रोष कमी करणे आणि मराठा समाजालाही सोबत ठेवण्यासाठीच डॉ. भामरेंना  केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिल्याचं बोललं जातंय. 


जमेच्या बाजू... 


डॉ. भामरे यांनी गेल्या दोन वर्षात अनेक समित्यांचे परदेशात भारताचं प्रतिनिधीत्व केलंय. हिंदी, इंग्रजी भाषेवरील पकड आणि उच्च शिक्षण याही डॉ. सुभाष भामरेंच्या जमेच्या बाजू आहेत.


धुळे लोकसभा मतदारसंघ हा नाशिक आणि धुळे अशा दोन जिल्ह्यांचं प्रतिनिधीत्व करणारा मतदारसंघ आहे. त्यामुळं डॉ. भामरेंना मंत्रिपद मिळाल्यानं या दोन्ही जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय.


डॉ. भामरे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने मराठा समाज, उत्तर महाराष्ट्रातील बहुजन समाज आणि राज्यातील उच्च शिक्षितांमध्ये भाजपची प्रतिमा उजळणार आहे. त्याचा भाजपलाही फायदा होणार आहे.. आता केंद्राप्रमाणे राज्यातही धुळे जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.