येवला :  उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसल्याचं चित्र आहे तर विद्यमान मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. राहता नगराध्यक्षपदावर  काँग्रेसचा दारूण पराभव झालाय. तसंच भाजप आणि महायुती आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अटकेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांनाही येवला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झटका बसलाय. भाजपच्या उमेदवारानं राष्ट्रवादीचा पराभव केलाय. राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेनेला सारख्या जागा मिळाल्यामुळं थोडासा दिलासा मिळालाय. तर खान्देशात हिंसेमुळं सर्वात लक्षवेधी ठरलेल्या अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी यांच्या गटाचा दारूण पराभव झालाय. 


स्थानिक विकास आघाडीच्या उमेदवारानं त्यांच्या पत्नीचा पराभव केलाय. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारलीय. भगूर, मनमाड, नांदगाव, सिन्नर पालिकेत शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शहादा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आली असून विजयकुमार गावितांच्या नेतृत्वात भाजपनं सत्ता मिलवलीय. 


खान्देशातल्या मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा राखलीय. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचामध्ये काँग्रेसची दहा वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावलाय. दोंडाईचामध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला असून 24 पैकी भाजपचे 20 नगरसेवक निवडून आले आहेत. तर धरणगावमध्ये सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपलं वर्चस्व कायम राखलंय. 


धरणगावमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला असून बहुमतानं नगरसेवक निवडून आले आहेत. शिरपूरमध्ये काँग्रेस माजी मंत्री अमरिश पटेल यांनी आपली सत्ता अबाधित राखलीय.