होबॉर्ट :  जगभरातील क्रिकेटप्रेमींची मान शरमेनं खाली जाईल अशी घटना 'ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका' दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घडलीय. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एका प्रेक्षकानं दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू हाशिम अमलाला 'दहशतवादी' म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रेक्षकाच्या हातात असलेल्या फलकावर अमलाविरोधी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. पोलिसांनी तातडीनं सीसीटीव्हीच्या मदतीनं त्या प्रेक्षकाला ओळखून मैदानाबाहेर हाकलून दिलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं देखील तात्काळ कारवाई करत त्या प्रेक्षकावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.


या प्रकरणावर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं तातडीनं आपली भूमिका मांडलीय. अशा प्रकारचं कृत्य अजिबात सहन केलं जाणार नाही असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलंय. अशा प्रकारची घटना जेव्हा घडते, तेव्हा आम्ही तातडीनं कारवाई करत असतो, असंही क्रिकेट ऑस्ट्रेलियानं म्हटलंय. 


बंदी घालण्यात आलेल्या प्रेक्षकाला आता ऑस्ट्रेलियात होणारा कोणताही क्रिकेटचा सामना स्टेडियममध्ये पाहता येणार नाहीए. आणि जर त्याने याचा भंग केला तर त्याला पोलिस कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.