मुंबई : भारतीय शरीरसौष्ठवाला एकीचे बळ आणि आर्थिक श्रीमंती मिळवून देणाऱ्या चेतन पाठारेंकडेच इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे सरचिटणीसपद कायम राहिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2016 ते 2020 सालासाठी झालेल्या चारवार्षिक निवडणुकीत सदस्य वगळता सर्व पदांसाठी निवडणूक बिनविरोध झाल्याने पाठारेंच्या कारभारावर शरीरसौष्ठव संघटनेने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. 


तसेच पद्मश्री प्रेमचंद डेगरा यांची अध्यक्षपदी तर व्यायाममहर्षी मधुकरराव तळवलकर यांची कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे.


चेतन पाठारे यांच्याकडे चार वर्षांपूर्वी भारतीय शरीरसौष्ठवाची सुत्रे आल्यानंतर या खेळाचा सारा चेहरामोहराच बदलला होता. त्यांनी या खेळाला सर्वप्रथम एकीचे बळ देताना सर्व संघटनांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. तसेच या खेळाचे दिवसेंदिवस वाढत चाललेले ग्लॅमर अबाधित राहावे म्हणून त्यांनी भारतात मि.युनिव्हर्ससारख्या भव्य दिव्य स्पर्धेचे दिमाखदार आयोजन केले. 


सर्वात महागड्या असलेल्या या खेळातील खेळाडूंनाही श्रीमंत करताना त्यांनी राष्ट्रीयच नव्हे तर जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही विजेत्यांना लखपती केले. 


गेल्या चार वर्षात त्यांनी फक्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यामातून खेळाडूंवर पाच कोटींच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव केला. आता त्यांनी सरकार दरबारी शरीरसौष्ठवाचे वजन वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले असून ऑलिम्पिक खेळांप्रमाणे शरीरसौष्ठवालाही अनुदान मिळावे म्हणून आपली संघटना कार्य करणार असल्याचे पाठारे यांनी सांगितले.


आमचीच एकमेव अशी संघटना आहे, ज्याचे अध्यक्षपद आमच्याच खेळात सर्वौच्च स्थान मिळविणाऱया प्रेमचंद डेगरा यांच्या हाती आहे. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे डेगरा हे आजही शरीरसौष्ठवपटूंचे आदर्श आहेत. 


भारताला मि.युनिव्हर्सचा किताब मिळवून देणाऱया डेगरा यांच्याकडे अध्यक्षपद कायम राहिल्यामुळे शरीरसौष्ठव आर्थिकदृष्टया आणखी बळकट होईल, असा विश्वासही पाठारे यांनी व्यक्त केला. लुधियाना येथे झालेल्या निवडणूकीत केवळ सदस्य पदासाठी निवडणूक झाली, ज्यात 2 पदांसाठी 3उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणूक झाली आणि यात रतन सिंग (33 मते) आणि प्रसन्ना महासौर (31) हे दोघे प्रथम क्रमांकाची मते मिळवून सदस्यपदी निवडून आले.


इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनची 2016 ते 2020 सालासाठी निवडण्यात आलेली कार्यकारिणी


अध्यक्ष - प्रेमचंद डेगरा (पंजाब),


कार्यकारी उपाध्यक्ष - मधुकर तळवलकर (महाराष्ट्र),


उपाध्यक्ष - अमित स्वामी (हरयाणा), अरविंद मधोक (राजस्थान), लेस्ली जॉन पीटर(केरळ), सुरिंदर शर्मा (दिल्ली), विनोद शर्मा (दिल्ली),


सरचिटणीस - चेतन पाठारे (महाराष्ट्र),


सहसचिव - अतीन तिवारी (मध्य प्रदेश), महेश चौधरी (हरयाणा),


कोषाध्यक्ष - रमेशकुमार स्वामी (आंध्र प्रदेश),


आयोजन सचिव - अजित सिद्दनवार (कर्नाटक), भाबाज्योती गोस्वामी (आसाम), नवनीत सिंग (पंजाब), टी.व्ही.पॉली (केरळ),


सदस्य - रतन सिंग (मणिपूर), प्रसन्ना महासौर (ओडिशा).