वेस्ट इंडिज जिंकली तरी सॅमीला खंत
2016 च्या टी 20 वर्ल्ड कपवर वेस्ट इंडिजनं आपलं नाव कोरलं आहे. अत्यंत कठीण परिस्थितीमधून सध्या वेस्ट इंडिज क्रिकेट जात आहे.
कोलकता: 2016 च्या टी 20 वर्ल्ड कपवर वेस्ट इंडिजनं आपलं नाव कोरलं आहे. अत्यंत कठीण परिस्थितीमधून सध्या वेस्ट इंडिज क्रिकेट जात आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंचे वाद सुरु आहेत. याचाच प्रत्यय वेस्ट इंडिजनं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही आला.
वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीनं मॅच नंतरच्या प्रेझेंटेशन सेरीमनीवेळी भावूक होऊन वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाविषयी नाराजी आणि खंत व्यक्त केली.
वर्ल्ड कप खेळणार का नाही माहित नव्हतं
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंबरोबर सुरु असलेल्या वादामुळे, ही स्पर्धा सुरु व्हायच्या काही काळ आधी पर्यंत आम्ही या स्पर्धेत खेळणार का नाही हे माहिती नव्हतं, असं सॅमी म्हणाला आहे.
आमच्याकडे युनिफॉर्मही नव्हते
आम्ही दुबईवरून भारतामध्ये दाखल झालो तेव्हा आमच्याकडे युनिफॉर्मही नव्हते, अशी खंत सॅमीनं व्यक्त केली.
बोर्डावर नाराज
वेस्ट इंडिजचा हा विजय कॅरेबियनमधल्या फॅन्ससाठी आहे, पण अजूनही वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, ही निराशादायक गोष्ट आहे, असं सॅमी म्हणाला आहे.
यांच्याबरोबर कधी खेळीन माहित नाही
या खेळाडूंबरोबर मी पुन्हा कधी खेळीन माहिती नाही, कारण आम्हाला वेस्ट इंडिजच्या प्रत्येक मॅचमध्ये खेळवलं जात नाही, अशी नाराजी सॅमीनं व्यक्त केली.
सगळे 15 खेळाडू चॅम्पियन
वेस्ट इंडिजच्या टीममध्ये क्रिस गेल मॅच विनर असल्याचं स्पर्धा सुरु होण्यापासून बोललं जात होतं, यावरही सॅमीनं अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या टीममधले सगळे 15 खेळाडू हे चॅम्पियन आहेत, असं सॅमी म्हणाला आहे.