रिओ दी जेनेरो : भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकर हिला तिच्या प्रशिक्षकांनी नजरकैदेत ठेवले आहे. दीपाने जिमनॅस्टिकमध्ये महिलांच्या व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठत इतिहास रचलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिमनॅस्टिकची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दीपा आणखी एक इतिहास रचणार का याकडे समस्त भारतीयांचे लक्ष आहे. या अपेक्षांचं दडपण तिच्यावर येऊ नये म्हणून प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनी तिला एका खोलीत ठेवले आहे.
 
रिओमध्ये वेटलिफ्टर साईखोम मीराबाई चानू आणि प्रशिक्षक नंदी यांच्यासोबत दीपा राहत आहे. नंदी यांनी तिच्या फोनमधील सिमकार्ड काढले आहे. खरंतर आज दीपाचा 23 वा वाढदिवस आहे. पण तिला फक्त तिच्या आईवडिलांशी बोलण्याची परवानगी आहे.
 
“मला दीपाचं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाहीये. तिचा वाढदिवस नंतर साजरा करता येऊ शकतो. मी तिला जे छोटे ब्रेक्स देतो त्यात ती फक्त आईवडिलांशी बोलते. शिवाय या गोष्टीचा तिला काहीच त्रास होत नाहीये. तिचे फ्रेंड्स फार कमी आहेत. त्यांच्यापासून लांब राहणंच तिला आवडतं” असे प्रशिक्षक नंदी यांनी  यावेळी सांगितले.

जिमनॅस्टिकमधील सर्वात कठीण असा प्रोड्युनोव्हा वोल्ट प्रकार सादर करत दीपाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 14 ऑगस्टला ही अंतिम फेरी होणार आहे .