युवराज दिसणार मोठ्या पडद्यावर
2011 चा वर्ल्ड कप भारताला जिंकवून देणारा युवराज सिंग आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
मुंबई: 2011 चा वर्ल्ड कप भारताला जिंकवून देणारा युवराज सिंग आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अमेरिकेतली एक फर्म युवराज सिंगच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री बनवणार आहे.
या डॉक्युमेंट्रीमध्ये युवराजचा कॅन्सरबरोबरचा लढाही दाखवण्यात येणार आहे. एपेक्स इंटरटेनमेंट ही कंपनी युवराजची ही डॉक्युमेंट्री बनवणार आहे. या कंपनीचे संस्थापक मार्क सियार्डी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
या डॉक्युमेंट्रीमधल्या गोष्टी खऱ्या वाटाव्यात यासाठी बहुतेक सगळं शूटिंग भारतातच करण्यात येणार आहे. भाग मिल्खा भागमध्ये कोचची भूमिका केकेले युवराजचे वडिल योगराज सिंग आणि आई शबनम या डॉक्युमेंट्रीमध्ये दिसतील असंही बोललं जात आहे.
ही डॉक्युमेंट्री पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल असा अंदाज आहे. या वर्षी मात्र महेंद्र सिंग धोनी आणि अजहर या भारतीय क्रिकेटपटूंचा बायोपिक रिलीज होणार आहे. धोनी द अनटोल्ड स्टोरी हा बायोपिक सप्टेंबरमध्ये तर अजहरचा बायोपिक मे मध्ये रिलीज होणार आहे.