मुंबई : रणजी चषकात आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्याच सामन्यात ७ विकेट घेणाऱ्या नाथू सिंगला आपण आयुष्यात कधी करोडपती होऊ असं स्वप्नातही कधी वाटलं नसेल. पण, शनिवारी मात्र त्याचं स्वप्न सत्यात उतरलं. 'मुंबई इंडियन्स' संघाने त्याच्यासाठी तब्बल ३.२ कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाथूचे वडील एका फॅक्टरीत काम करतात आणि महिन्याला केवळ सात हजार रुपये कमवतात. नाथूचे घरही अगदी लहान असून त्यावर साध्या पत्र्याचे छत आहे. आपल्या मुलाचे क्रिकेटवर असलेले प्रेम बघून त्याच्या वडिलांनी त्याला एका क्रिकेट क्लबमध्ये अगदी लहान वयात दाखल केले. 


नाथूचे वडील खरं तर राजस्थानातील एका लहानश्या खेड्यात शेती करत होते. पण, जेव्हा पैशांची जास्तच चणचण भासू लागली तेव्हा मात्र ते दिल्लीतल्या एका फॅक्टरीत कामाला लागले. त्याच्या वडिलांना धड हिंदीही बोलता येत नाही की क्रिकेटमधील फार काही ज्ञानही नाही. 


आज मात्र त्यांच्या मुलाने त्यांच्या कष्टांच चीज केल्याची त्यांची भावना आहे. नाथू सिंग १४० किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने बॉलिंग करू शकतो. त्याने याआधी १४५ किमी/तास इतका वेगही गाठला आहे.