बोर्डेक्स : युरोकपमध्ये विश्वविजेत्या जर्मनीनं इटलीचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारलीये. पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात विश्वविजेत्या जर्मनीने इटलीवर ६-५ अशी मात करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीने संपूर्ण सामन्यात जर्मनीला कडवी झुंज दिली. दोनही संघांनी आपल्या लौकीकाला साजेसा खेळ दाखवला. पहिल्या हाफपर्यंत दोनही संघांना खातं उघडता आलं नाही. पण फुटबॉल रसिकांना तंत्रशुद्ध आणि रंगतदार सामन्याचा नजराणा अनुभवता आला. दुस-या हाफमध्ये जर्मनीने आक्रमक पवित्रा घेतला.


सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला जर्मनीच्या ओझीलने पहिला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर काही मिनिटात इटलीकडे पेनल्टीची संधी चालून आली. संधीचे सोने करत इटलीच्या बनुचीने गोल करून सामन्यात रंगत आणली. मग सामन्याच्या अखेरपर्यंत दोनही संघांमध्ये कडवं द्वंद्व पाहायला मिळालं. सामन्याचा निर्धारीत वेळ आणि अतिरिक्त वेळेनंतरही कोणत्याही संघाला आघाडी घेता आली नाही. 


सामना १-१ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे सामना पेनल्टी शूट आऊटवर येऊन ठेपला. पेनल्टी शूट आऊटमध्येही रोमांच पाहायला मिळाला. पहिल्या पाच पेनल्टीमध्येही सामना २-२ असा बरोबरीत होता. 


पुढे आणखी पाच पेनल्टी कीक वाढविण्यात आल्यानंतर अखेरच्या क्षणी जर्मनीने आघाडी घेत सामना ६-५ असा जिंकला. विशेष म्हणजे, युरो कपच्या इतिहासात विश्वविजेत्या जर्मनीला पहिल्यांदाच इटलीवर मात करता आली आहे.