काँग्रेस प्रवेशाच्या बातम्यांना हरभजनचा पूर्णविराम
भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग काँग्रेसच्या तिकीटावर पंजाबच्या जलंदर विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या.
नवी दिल्ली : भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग काँग्रेसच्या तिकीटावर पंजाबच्या जलंदर विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या. या चर्चांना आता खुद्द हरभजन सिंगनंच पूर्णविराम दिला आहे. नजीकच्या भविष्यात कोणत्याच राजकीय पक्षामध्ये जाण्याचा माझा विचार नाही. कृपया अफवा पसरवू नका, असं ट्विट हरभजननं केलं आहे.
याआधी मंगळवारी नवजोत सिंग सिद्धूनं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली होती. 30 मिनीटं या दोघांमध्ये चर्चा झाली. नवजोत सिंग सिद्धूची बायको नवजोत कौर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ही भेट घेण्यात आली आहे.
राहुल गांधींची भेट घेण्याआधी नवजोत सिंग सिद्धूनं पंजाबचे काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग यांचीही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. अमृतसरची लोकसभा पोटनिवडणूक लढण्याची सिद्धूला इच्छा नसल्याचं सिद्धूनं अमरिंदर सिंगना सांगितल्याची माहिती आहे. निवडणूक लढण्याऐवजी सिद्धूनं पक्षाच्या प्रचाराला पसंती दिली आहे.