दुबई : भारतानं पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला नकार दिल्यामुळे आयसीसीनं पाकिस्तानच्या महिला टीमला सहा पॉईंट्स खिरापत म्हणून दिले आहेत. भारतीय महिला टीम पाकिस्तानविरुद्ध आयसीसी वूमन्स चॅम्पियनशीपच्या तीन मॅच खेळणार होती. या मॅचबाबत बीसीसीआयकडून काहीच पावलं उचलली गेली नसल्यामुळे आयसीसीनं हा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅच खेळण्यासाठी आयसीसीनं बीसीसीआयला मेल केले होते, पण बीसीसीआयकडून या मेलना कोणतंच प्रत्युत्तर मिळालं नाही अशी माहिती सूत्रांनी पीटीआयला दिली आहे. भारत पाकिस्तानबरोबर क्रिकेट का खेळत नाही याचं कारण आयसीसीनं या मेलमध्ये बीसीसीआयला विचारलं होतं.


बीसीसीआयनं क्रिकेट न खेळण्याची कारणं सांगितली असती तर पाकिस्तानला असे सहा पॉईंट्स दिले नसते असं स्पष्टीकरणही आयसीसीनं दिलं आहे. दोन देशांमध्ये क्रिकेट खेळलं जात नसेल तर त्याबाबत आयसीसीला लेखी माहिती देणं बंधनकारक असल्याचा नियम असल्याचंही आयसीसीनं सांगितलं आहे.  


भारत आणि पाकिस्तानच्या महिला टीममध्ये 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबरपर्यंत तीन सामने खेळले जाणार होते, पण दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेल्यामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामने होत नाहीयेत.


याआधी 2003च्या वर्ल्ड कपवेळी न्यूझीलंडनं झिम्बाब्वेबरोबर तसंच इंग्लंडनं केनियाबरोबर खेळायला नकार दिला होता. यामुळे झिम्बाब्वे आणि केनियाला वर्ल्ड कपचे पॉईंट्स दिले होते.