भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेट युद्ध
भारत आणि पाकिस्तानमधला क्रिकेटचा सामना बघण्याची संधी क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा मिळणार आहे.
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधला क्रिकेटचा सामना बघण्याची संधी क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा मिळणार आहे. २०१७साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक आयसीसीनं प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत.
इंग्लंडमध्ये २०१७ साली होणाऱ्या या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बी मध्ये भारताबरोबर पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.
इंग्लंडच्या एजबॅस्टन मैदानावर ४ जून २०१७ ला भारत आपली चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली मॅच पाकिस्तानविरुद्ध खेळेल.
ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, इंग्लंड आणि बांग्लादेशची टीम आहे. ३० सप्टेंबर २०१५ ला आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये पहिल्या आठ क्रमांकावर असलेल्या टीम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार आहेत.
दोन्ही ग्रुपमधल्या टॉप २ टीम सेमी फायनलमध्ये खेळतील, तर १८ जून २०१७ ला फायनल होईल. १८ दिवस चालणारी ही चॅम्पियन्स ट्रॉफी आजपासून बरोबर वर्षानी म्हणजेच १ जून २०१७ ला सुरु होईल. १८ जूनला ओव्हल मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल होईल.
याआधी २०१३ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा विजय झाला होता. फायनलमध्ये धोनीच्या संघानं इंग्लंडचा पराभव केला होता. आता पुन्हा होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा संघ ट्रॉफी वाचवण्यासाठी मैदानात उतरेल. २०१३ साली झालेली चॅम्पियन्स ट्रॉफीही इंग्लंडमध्येच झाली होती.