बंगळुरु : बंगळुरूमध्ये सुरू असलेला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा कसोटी सामना अत्यंत रंगतदार स्थितीत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आज ऑस्ट्रेलिया 48 धावांच्या आघाडीसह खेळाला सुरूवात करेल. रविवारी दिवस अखेर कांगारूंना 6 बाद 237 धावांपर्यंत मजल मारता आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय गोलंदाजांनी आपलं सगळं कसब दिवसभर पणाला लावलं. त्यामुळेच दिवसभराच्या खेळात ऑस्ट्रेलियन बॅटिंग ऑर्डर संपूर्णपणे जखडून ठेवण्यात यश आलं. रवींद्र जडेजानं तीन बळी मिळवले. तरी उमेश यादव आणि आर अश्विननं अत्यंत तिखट मारा केला. 


ईशांत शर्मानेही दिवसभर छोट्या छोट्या स्पेल्समध्ये धारदार गोलंदाजी केली. मारा तिखट असला, तरी ऑस्ट्रेलियन खेळाडूसुद्धा खेळपट्टीवर तंबू गाडून उभे राहण्याच्या उद्देशानंच मैदानात आल्याचं स्पष्ट होतं. स्टीव्ह स्मिथला स्वस्तात माघारी जावं लागलं. 


पण ऑस्ट्रेलियाकडून नवोदित मॅट रेनशो आणि शॉन मार्श या दोघांनीही अर्धशतकं ठोकली. दिवसअखेर मॅथ्यू वेड 25 आणि मिचेल स्टार्क 14 धावा काढून नाबाद राहिले. सहा खेळाडू आधीच तंबूत गेल्यानं आता ऑस्ट्रेलिया संघाला मोठी आघाडी घेऊ न देता, लवकरात लवकर तंबूत धाडण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांपुढे असणार आहे.