नवी दिल्ली : आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेटच्या पात्रता फेरीच्या अखेरच्या मॅचमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताची प्रभारी कॅप्टन हरमनप्रीत कौरने शेवटच्या दोन बॉलपैकी एकावर सिक्स आणि एका बॉलवर दोन रन्स काढत थरारक विजय मिळवून दिला. महिला वर्ल्डकप पात्रता फेरीच्या या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा बॅटिंग करताना 50 ओव्हरमध्ये 244 रन्स केले. भारताच्या राजेश्वरी गायकवाडने तीन तर शिखा पांडेने दोन विकेट्स घेतल्या.


आफ्रिकेच्या 244 रन्सचा पाठलाग करताना भारताने धमाकेदार सुरुवात केली. मोना मिश्राने 82 चेंडूत 59 धावांची खेळी केली. 43 षटकानंतर भारताची 4 विकेट्सवर 209 अशी स्थिती होती. मात्र त्यानंतर 14 रन्समध्ये भारताने 4 विकेट्स गमावल्या आणि मॅचमध्ये ट्विस्ट आला.


 अखेरच्या ओव्हरमध्ये भारताला नऊ रन्सची गरज असताना 2 रन काढण्याच्या प्रयत्नात पूनम यादव आऊट झाली. त्यानंतर सलग तीन बॉल्सवर हरमनप्रीतला एकही रन काढता आला नाही. त्यामुळे 2 बॉलमध्ये 8 रन्स अशी भारताची अवस्था झाली. यावेळी हरमनप्रीतनं संयमी खेळी करत सिक्सर ठोकला. शेवटच्या बॉलवर दोन रन्स काढून हरमनप्रीतने भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला.