मुंबई: सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग यासारख्या क्रिकेटपटूंनी भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावलं. पण या क्रिकेटपटूंच्याही काही अंधश्रद्धा होत्या. मैदानात उतरण्यापूर्वी हे खेळाडू ज्या गोष्टी करतात त्याला अंधश्रद्धाच म्हणावं लागेल. 


युवराज सिंग, एम.एस.धोनी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते युवराज सिंग आणि एम.एस. धोनी. मैदानात उतरताना युवराज सिंग नेहमी 12 नंबरची तर धोनी 7 नंबरची जर्सी घालतो. युवराजचा वाढदिवस 12 तारखेला तर धोनीचा वाढदिवस 7 तारखेला असल्यानं ते या जर्सी घालतात. 


सौरव गांगुली


भारताचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन म्हणजे सौरव गांगुली. मैदानामध्ये जायच्या आधी गांगुली नेहमी खिशात आपल्या गुरुंचा फोटो ठेवायचा. 


आर. अश्विन


2011 च्या वर्ल्ड कपमध्ये अश्विन फक्त 2 मॅच खेळू शकला, पण त्यावेळी अश्विन एक बॅग घेऊन फिरायचा. या बॅगमुळेच टीम जिंकत असल्याची त्याची अंधश्रद्धा होती. वर्ल्ड कपनंतरही तो ही बॅग घेऊन फिरत होता. 


राहुल द्रविड


भारतीय संघासमोर जेव्हा कठीण प्रसंग यायचा तेव्हा राहुल द्रविड नेहमीच धावून आला. राहुल द्रविडचा स्वभाव पाहता तो अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नसेल असाच समज होईल. पण मैदानात जायच्या आधी द्रविड उजवा थायपॅड आधी घालायचा. एवढच नाही तर फक्त सीरिज सुरु व्हायच्या आधीच द्रविड नवी बॅट वापरायचा. 


झहीर खान


भारताच्या सर्वोत्तम फास्ट बॉलर पैकी एक म्हणजे झहीर खान.  मैदानात उतरण्यापूर्वी झहीर नेहमी आपला पिवळा रुमाल खिशामध्ये ठेवायचा.


मोहिंदर अमरनाथ


1983चा वर्ल्ड कप भारताला जिंकवून देण्यात मोहिंदर अमरनाथ यांनी मोलाचं योगदान दिलं.  झहीर खानप्रमाणेच मोहिंदर अमरनाथही त्यांच्यासाठी लकी असलेला लाल रुमाल घेऊन मैदानात यायचे.


अनिल कुंबळेच्या स्वेटरनं घडला इतिहास


दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानामध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये अनिल कुंबळेनं एका इनिंगमध्ये 10 विकेट घेऊन इतिहास रचला. या मॅचमध्ये जेव्हा कुंबळे बॉलिंगला यायचा तेव्हा सचिन तेंडुलकर कुंबळेचा स्वेटर आणि टोपी अंपायरला द्यायचा.


वीरेंद्र सेहवाग


आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये सेहवागनं अनेक नंबरच्या जर्सी वापरल्या. पण करियरच्या शेवटी सेहवागच्या जर्सीवर कोणताच नंबर नसायचा. आयसीसीला मात्र सेहवागची ही जर्सी पटली नाही. तरीही सेहवाग मात्र तीच जर्सी घालून खेळला. 


सचिन तेंडुलकर


क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले बहुतेक सगळेच विक्रम सचिनच्या नावावर आहेत. पण मैदानात बॅटिंगला जायच्या आधी सचिन त्याच्या डाव्या पायामध्ये पहिले पॅड घालायचा.


2011 वर्ल्ड कपच्या शेवटच्या काही ओव्हरही सचिननं बघितल्या नाहीत. आपण मॅच बघत बसलो तर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल अशी त्याची अंधश्रद्धा होती. पण सचिनच्या मॅच न बघण्याचा भारताला फायदा झाला, आणि 28 वर्षांनंतर भारतानं पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला.