आयपीएलमध्ये कोलकत्याचा विक्रमी विजय
आयपीएल १० च्या आजच्या सामन्यात कोलकता नाईट राइडर्सने गुजरात लायन्सचा ३१ चेंडू आणि १० विकेट राखून पराभव केला. गुजरातच्या १८४ धावांचे आव्हान त्याने १४.५ षटकात पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
राजकोट : आयपीएल १० च्या आजच्या सामन्यात कोलकता नाईट राइडर्सने गुजरात लायन्सचा ३१ चेंडू आणि १० विकेट राखून पराभव केला. गुजरातच्या १८४ धावांचे आव्हान त्याने १४.५ षटकात पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर आणि तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिन या सलामी जोडीने बिनबाद १८४ धावांचे आव्हान पूर्ण केले.
गुजरातच्या गोलंदाजांचे पिसं काढत ख्रिस लिनने केवळ ४१ चेंडूत नाबाद ९३ धावा ठोकल्या, तर गौतम गंभीरने ४८ चेंडूत नाबाद ७६ धावा करून विक्रमी भागीदारी साकारली. ख्रिस लिनने सामन्याच्या सुरूवातीपासूनचे धडाकेबाज फलंदाजी केली. गंभीरनेही आपल्या नावाला साजेल अशी खेळी करत दिलखेच फटकेबाजी केली.
ख्रिस लिनने आपल्या खेळीत तब्बल ८ खणखणीत षटकार आणि ६ चौकार ठोकले. तर गंभीरच्या खेळीत १२ चौकारांचा समावेश होता.
सुरूवातीला गुजरात लायन्सने प्रथम फलंदाजी करत कोलकत्यासमोर विजयासाठी १८४ धावांचे आव्हान ठेवले होते. गुजराचा कर्णधार सुरेश रैनाच्या नाबाद ६८ धावा आणि दिनेश कार्तिकच्या २५ चेंडूत ४७ धावांची तुफान खेळीच्या जोरावर संघाला २० षटकांच्या अखेरीस १८३ धावांपर्यंत मजल मारली होती.