चॅनेलच्या या चुकीने भारत हरला?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताला पराभव सहन करावा लागला. या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 असा विजय मिळवला.
मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताला पराभव सहन करावा लागला. या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 असा विजय मिळवला. पहिल्या सामन्यात भारताला केवळ एक धावेने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधी होती मात्र पावसाने सगळ्यांचीच निराशा केली आणि सामना अनिर्णीत राहिला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत वेस्ट इंडिजचा डाव 143 धावांवर संपवला. त्यानंतर भारताने फलंदाजीस सुरुवात केली. मात्र केवळ दोन षटकांचाच खेळ होऊ शकल्याने सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला.
दरम्यान, भारताचा पराभव प्रसारणातील तांत्रिक चुकीमुळे झाल्याचे बोलले जातेय. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार होता. मात्र हा सामना रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी सुरु झाला. सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, सॅटेलाईट ट्रॅक बदलण्यात येणार होता त्यामुळेच सामना उशिरा सुरु करण्यात आला. मात्र त्यामुळे 40 मिनिटांचा खेळ वाया गेला. या 40 मिनिटांत 10 षटकांचा खेळ होऊ शकला असता.
त्यामुळे हा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी होता की चॅनेलसाठी असा सवाल केला जातोय. सामना रद्द झाल्याप्रकरणी धोनीनेही नाराजी व्यक्त केली होती.