नवी दिल्ली : डोपिंगमध्ये अपयशी ठरलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादव प्रकरणात आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा कुस्तीपट्टू नरसिंग यादव उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यावर आता त्याची रिओ वारी धोक्यात आलीय. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः याप्रकरणी लक्ष घातल्यानं नरसिंगला अजूनही ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत. पंतप्रधानांनी स्वतः पक्षाच्या बैठकीत याविषयी चर्चा केल्याचं आज कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण यांनी सांगितलं. आता पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घातल्यानं याची लवकरात लवकर चौकशी होऊन उद्या होणाऱ्या वाडा समोरच्या सुनावणीत नरसिंगच्या ष़डयंत्राच्या दाव्याला पुष्टी मिळेल असंही बृजभूषण यांनी म्हटलंय. 


दरम्यान, नरसिंग यादवनं आपण उत्तेजक द्रव्यांचं सेवन केलं नसून हे आपल्याविरुद्ध षडयंत्र असल्याचा दावा केलाय. 


राज्यातले नेत्यांचा पाठिंबा


आता, नरसिंगच्या या दाव्यांना राज्यातल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केलीय. राज्य सरकारनं नरसिंग यादवच्या पाठिशी उभं राहून त्याला रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी मदत करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील नरसिंग यादवच्या पाठिशी उभे राहिलेत. 


बुधवारी नरसिंग यादवला आपली वर्ल्ड अॅन्टी डोपिंग अथॉरिटीसमोर आपली बाजू मांडायची आहे. जर तो आपल्या विरोधातलं षडयंत्र सिद्ध करु शकला, तरच तो रिओला जाऊ शकेल. अन्यथा त्याची रिओ वारी हुकल्यात जमा आहे.