मुंबई: आयपीएलच्या नवव्या सिझनच्या पहिल्याच मॅचमध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट्सनं मुंबई इंडियन्सचा तब्बल 9 विकेट्सनं पराभव केला आहे. पुण्याच्या या विजयामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं ते आधी त्यांचे बॉलर्स आणि मग अजिंक्य रहाणेनं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये टॉस जिंकून मुंबईनं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण तो त्यांच्या चांगलाच अंगाशी आला. स्कोरबोर्डवर फक्त 40 रन असताना मुंबईचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. पण हरभजन सिंगनं 30 बॉलमध्ये 45 रन करून मुंबईचा स्कोर 121 रनपर्यंत पोहोचवला. 


पुण्याकडून इशांत शर्मा आणि मिचेल मार्शनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर आर.पी.सिंग, रजत भाटीया, आर.अश्विन आणि मुरुगन अश्विनला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. 


122 रनचा पाठलाग करायला आलेल्या पुण्याला मात्र अजिबात अडचण आली नाही. अजिंक्य रहाणेनं 42 बॉलमध्ये नाबाद 66 रन केल्या तर डुप्लेसी 34 रनवर हरभजनचा शिकार झाला. अनेक वर्षानंतर कमबॅक करणारा केव्हिन पीटरसनही या मॅचमध्ये फॉर्ममध्ये दिसला, त्यानं 14 बॉलमध्ये 21 रन केल्या.