\नवी दिल्ली :  टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची वर्णी? लागण्याची शक्यता आहे, कारण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला नजिकच्या काळात टीम डायरेक्टर म्हणून बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याचे संकेत, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीकडून देण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल कुंबळेला टीम इंडियाच्या संचालकपदी बढती मिळाल्यास त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका प्रशिक्षक म्हणून अखेरची कसोटी मालिके असेल. त्यामुळे त्यांच्या जागी अंडर-19 संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची वर्णी लागू शकते, असं बोललं जात आहे.


प्रशासक समितीच्या या प्रयत्नांना १४ एप्रिलपर्यंत मूर्त स्वरुप मिळालं, तर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक या नात्याने अनिल कुंबळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अखेरची जबाबदारी सांभाळताना दिसेल. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासक समितीला बीसीसीआयचा ढाचाच बदलायचा आहे, त्यामुळे त्यांनी कुंबळेला नव्याने सर्वसमावेशक अहवाल बनवण्याची सूचना केली आहे.


बंगळुरू कसोटीनंतर कुंबळेने बीसीसीआय प्रशासकांची भेट घेतली होती. त्यांनी कुंबळेला भारताच्या सर्व संघांविषयी एक सर्वसमावेशक अहवाल तयार करण्यासाठी सांगितलं आहे. वास्तविक कुंबळे आणि राहुल द्रविड यांनी मिळून गेल्याच वर्षी बीसीसीआयला एक दिशादर्शक अहवाल दिला होता.