रांची टी-20 मध्ये झाली ही रेकॉर्ड्स
श्रीलंकेविरुद्धच्या रांची टी-20 मध्ये भारताचा 69 रननी दणदणीत विजय झाला आहे.
रांची: श्रीलंकेविरुद्धच्या रांची टी-20 मध्ये भारताचा 69 रननी दणदणीत विजय झाला आहे. भारताच्या या विजयामुळे अनेक रेकॉर्ड्सही बनली आहेत.
तिसरा मोठा विजय
69 रननी झालेला हा विजय भारताचा तिसरा मोठा विजय आहे. याआधी 2012 मध्ये भारतानं इंग्लंडचा 90 रननी तर 2012 मध्येच ऑस्ट्रेलियाचा 73 रननी पराभव केला होता.
सहावी सगळ्यात मोठी धावसंख्या
196-6 ही टीम इंडियाची सहावी मोठी धावसंख्या आहे. इंग्लंड विरुद्ध डर्बनच्या मैदानात केलेल्या 218 रन ही आत्तापर्यंतची भारताची सगळ्यात मोठी धावसंख्या आहे. याच मॅचमध्ये युवराजनं सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारण्याचा विश्वविक्रम केला होता.
परेराची हॅट्रिक
या मॅचमध्ये श्रीलंकेच्या थिसारा परेरानं हॅट्रिक घेतली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये हॅट्रिक घेणारा परेरा हा चौथा खेळाडू आहे. याआधी ब्रेट ली, जेकब ओरम आणि टीम साऊथीनं हॅट्रिक घेतली होती.
शिखर धवनची हाफ सेंच्युरी
या मॅचमध्ये शिखर धवननं 22 बॉलमध्ये 50 रन केल्या. भारतीय बॅट्समनची ही पाचवी फास्ट हाफ सेंच्युरी आहे. यातल्या पहिल्या तीन या युवराज सिंगच्या तर चौथी फास्ट हाफ सेंच्युरी गौतम गंभीरच्या नावावर आहे.
युवराजनं 12 बॉल आणि 19 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी तर गौतम गंभीरनं 19 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी केली होती.