`वाडा`ने क्लिन चीट फेटाळली, नरसिंग यादव ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची साशंकता
भारताचा आघाडीचा मल्ल नरसिंग यादव रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची साशंकता अद्याप कायम आहे.
नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा मल्ल नरसिंग यादव रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची साशंकता अद्याप कायम आहे. नाडाने दिलेली क्लिन चीट वाडाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे अद्याप खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्था (नाडा) या संस्थेने नरसिंग यादवला क्लिन चीट दिली. मात्र, आज मंगळवारी जागतिक उत्तेजकविरोधी संस्था (वाडा) या संस्थेने नाडाची क्लिन चीट फेटाळून लावली. त्यामुळे नरसिंग यादववर असलेली ४ वर्षांची बंदी यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.
नरसिंग यादवने वाडाकडे आपली बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला असून, याप्रकरणावरील पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. नाडाच्या अहवालातून क्लीन चीट मिळाल्यानंतर नरसिंग यादवचा रिओ ऑलिम्पिकचा मार्ग सुकर झाल्याचे म्हटले जात होते.
नाडाच्या क्लिन चीटनंतर नरसिंग यादव देखील रिओमध्ये दाखल झाला. मात्र, नरसिंगचे हे प्रकरण आता क्रीडा लवादकडे जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. नरसिंगचा पहिला सामना १९ ऑगस्ट रोजी होणे अपेक्षित आहे. तर त्याच्या सहभागाचा निर्णय एक दिवस आधी होणार आहे.
दरम्यान, वाडाकडून ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी नरसिंगची चाचणी घेतली जाऊ शकते. या चाचणीत तो दोषी आढळला तर तो ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. तसेच नरसिंगने जर पदक पटकावले, तर नियमानुसार त्याची चाचणी होईल. यात तो दोषी आढळला तर त्याचे पदक काढून घेतले जाईल.