महिला तिरंदाजी टीम क्वार्टर फायनलमध्ये पराभूत
तिरंदाजीत भारतीय महिला संघाला रशियाकडून पराभवाचं तोंड बघावं लागलं.
रिओ : तिरंदाजीत भारतीय महिला संघाला रशियाकडून पराभवाचं तोंड बघावं लागलं.
रिओ ऑलिम्पिक २०१६ च्या क्वार्टर फायनलमध्ये रशियाविरुद्ध खेळताना ४-५ नं पराभूत होत भारतीय टीम या स्पर्धेच्या बाहेर झालीय. दीपिका रानी, लक्ष्मीरानी मांझी आणि एल बोंबायला देवी या तिघींनी रशियाला तगडी टक्कर देण्याचा प्रयत्न केला, पण...
शेवटच्या क्षणापर्यंत ताणल्या गेलेल्या अत्यंत उत्कंठावर्धक क्वार्टर फायनल रशियाविरुद्ध टायब्रेकरमध्ये दीपिका कुमारी आणि तिच्या सहकाऱ्यांना अपयश आलं. रशिया आणि भारत दोन्ही संघांमध्ये ४-५ अशी बरोबरी झाल्यावर टायब्रेकर खेळवण्यात आला.
अंतिम क्षणी भारताच्या आशा झारखंडच्या दीपिका कुमारीवर टिकून होत्या. शेवटच्या फेरीत दीपिकाला टेन पॉईंटरवर निषाणा साधणं अनिवार्य होतं. पण ऐन वेळी वाऱ्यांनं घात केला. दीपिकाचा बाण एट पॉईंटर सर्कलमध्ये जाऊन रुतला आणि अवघ्या दोन पॉईंट्सनं भारत स्पर्धेतून बाद झाला.
रिओ ऑलिम्पिकच्या सांबोड्रोम अरिनात रशिया आणि भारत यांच्यातल्या सामन्याच्या वेळी ताशी ३७ किमी वेगानं वारे वाहत होते. त्यामुळे लक्ष्य साधणं अत्यंत दुरापास्त बनत होतं. आम्ही आमच्या कडून १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला पण निसर्गासमोर आम्ही हतबल ठरलो, असं दीपिका कुमारीनं म्हटलंय.