मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 43 वा वाढदिवस आहे. क्रिकेटच्या इतिहासातले जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सेंच्युरी लगावलेल्या सचिनच्या अनेक अविस्मरणीय खेळी आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. यातल्या टॉप 10 खेळींवर एक नजर टाकूयात. 


1) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची डबल सेंच्युरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे क्रिकेटमध्ये पहिली डबल सेंच्युरी मारायचा मान सचिन तेंडुलकरचा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ग्वालीयर वनडेमध्ये सचिननं 147 बॉलमध्ये नाबाद 200 रनची खेळी केली. 


2) कोका-कोला कप फायनल


1998 च्या कोका-कोला कप फायनलमध्ये शाहरजाहत भारताला विजयासाठी 272 रनची आवश्यकता होती. या मॅचमध्ये सचिननं 131 बॉलमध्ये 134 रन बनवून भारताला कोका कोला कप जिंकवून दिला. 


3) शाहरजाहतली 'वादळी' खेळी


कोका-कोला कपमध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये सचिननं 131 बॉलमध्ये 143 रनची अफलातून खेळी केली. या मॅचवेळीच शाहरजाहच्या मैदानात दोन वादळं आली. एक वाळंवटातून आणि दुसरं सचिनचं. ही मॅच भारतानं गमवली असली तरी सचिनच्या या खेळीमुळे भारत फायनलमध्ये पोहोचला होता. 


4) 2003 वर्ल्ड कपमधल्या पाकिस्तानविरुद्धच्या 98 रन


या मॅचमध्ये सचिननं सेंच्युरी मारली नसली, तरी सचिनची ही एक आवडती खेळी आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये 274 रनचा पाठलाग करताना सचिननं 75 बॉलमध्ये 98 रन केल्या. शोएब अख्तर, वसिम अक्रम आणि वकार युनूस यांच्यासारख्या दिग्गजांना सचिननं या मॅचमध्ये लोळवलं. 


5) सीबी सीरीज फायनल, ऑस्ट्रेलिया


वनडेमधल्या सचिनच्या संयमी खेळीपैकी एक म्हणजे 2008च्या सीबी सीरिज फायनल. 240 रनचा पाठलाग करताना सचिननं 120 बॉलमध्ये नाबाद 117 रन केल्या आणि भारताला ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकता आली. ऑस्ट्रेलियात वनडे क्रिकेटमधली सचिनची ही एकमेव सेंच्युरी आहे. 


6) सचिनची पहिली टेस्ट सेंच्युरी


1990 च्या इंग्लंड विरुद्धच्या मॅन्चेस्टर टेस्टमध्ये सचिननं सेंच्युरी मारली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही सचिनची पहिलीच सेंच्युरी. चौथ्या इनिंगमध्ये टेस्ट वाचवण्यासाठी सचिन सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आला, आणि त्यानं 119 रनची खेळी केली आणि भारतानं ही मॅच ड्रॉ केली. 


7) पर्थ टेस्टमधली सेंच्युरी


1992 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली पर्थ टेस्टवर मारलेली सेंच्युरी सचिनच्या सर्वोत्तम खेळीपैकी एक मानली जाते. जगातल्या वेगवान विेकेटपैकी एक समजल्या जाणाऱ्या पर्थच्या विकेटवर सचिननं ऑस्ट्रेलियाच्या तडाखेबाज बॉलर्ससमोर 114 रन केल्या होत्या. 


8) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चेन्नई टेस्टमधली सेंच्युरी


1998 च्या चेन्नई टेस्टमध्ये सचिननं 180 बॉलमध्ये 155 रन केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये केलेल्या या सेंच्युरीमुळे भारतानं ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी कठीण लक्ष्य ठेवलं. या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. 


9) पाकिस्तानविरुद्धची चेन्नईतील सेंच्युरी


पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळताना सचिननं नेहमीच आपला खेळ उंचावला. या टेस्टमध्ये जिंकण्यासाठी भारताला 271 रनची आवश्यकता होती. तेव्हा सचिननं 136 रनची खेळी केली. पण सचिन आऊट झाल्यानंतर मात्र भारतीय बॅट्समननी रांग लावली आणि भारताचा 12 रननी पराभव झाला. 


10) इंग्लंडविरुद्धची चेन्नई टेस्ट


2008च्या इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई टेस्टमध्ये सचिननं नाबाद 103 रन बनवले. आणि अशक्य वाटणारं 387 रनचं टार्गेट भारतानं आरामात पार केलं. ही मॅच भारतानं सहा विकेट्सनं जिंकली.