नाशिक : भारताची अव्वल बॅडमिंटन स्टार सायना नेहवालनं निवृत्तीचे संकेत दिलेत. माझं करिअर लवकरच संपुष्टात येईल, असं मत सायनानं व्यक्त केलंय. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत सायना चायना ओपन सुपर सीरिजमधून कमबॅक करणार आहे.


'लवकरच संपणार करिअर'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फुलराणी सायनाला नेहवालला निवृत्तीची चिंता सतावतेय. रिओ ऑलिम्पिकनंतर सायना गुडघ्याच्या दुखापतीनं बेजार झाली होती. यानंतर तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही झाली होती... ती कमबॅकसाठी सज्जही झाली. मात्र, त्यापूर्वीच तिनं आपल्या निवृत्तीबाबत विधान करत आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिलाय.


'दुखापतींमुळे माझं बॅडमिंटनमधलं करीअरच आता संपतय. एखादी टुर्नामेंट मी जरी जिंकले तरी त्याचा आनंद होण्यापेक्षा दुखापतींचा त्रास अधिक होतो. अनेकांना माझं करिअर संपल्याची आणि मी कमबॅक करणं कठीण असल्याचं वाटतंय. माझ्या मनातही असेच प्रश्न अनेकवेळा येतात. माझं करिअऱ लवकरच संपेल... हे शक्य आहे. पाहूयात पुढे काय होतंय. त्याबाबत आता कोणीच काही सांगू शकत नाही' असं म्हणत दुखावलेल्या सायनानं आपल्या निवृत्तीविषयी भाकीत केलंय. मात्र, दुखापतीतून सावरत ती जोरदार कमबॅक करेल असा विश्वास बॅडमिंटनच्या दुनियेतून व्यक्त होतोय. 


दरम्यान, सायनानं हे विधान आताचं का केलं? आणि दुखापतीमुळे सायना मानसिकदृष्ट्या खचली आहे का? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालेत. सायनाला या आधीही अनेक वेळा दुखापतींनी ग्रासलं होतं आणि त्यातून तावून-सुलाखून बाहेर पडत सायनानं बॅडमिंटन कोर्टवर आपली जादू दाखवली होती.


फुलराणी धीर सोडू नकोस...


2009 मध्ये सायनाला खांद्याची दुखापत झाली होती... आणि त्यावेळी तिला तब्बल एक महिना बॅडमिंटन कोर्टपासून दूर रहावं लागलं होतं. 2010 मध्ये तिला घोट्याच्या दुखापतीनं सतावलं होतं. आणि यामुळे 2011 बॅडमिंटन सीझनमध्ये दुखापतींचा परिणाम तिच्या खेळावर झाला होता. 2014 ला सायना मांडीची दुखापतीनं बेजार झाली होती... आणि याचा तिला मोठा फटका बसला होता. 2016 मध्ये सायनाची गुडघ्याची दुखापत अधिक बळावली... आणि रिओ ऑलिम्पिकनंतर तिला बॅडमिंटन कोर्टपासून दूर रहावं लागलं. 


चीन ओपनमध्ये सायना पुन्हा बॅडमिंटन कोर्टवर उतरणार आहे. आता आपल्या कमबॅक टुर्नामेंटमध्ये सायना झोकात पुनरागमन करणार का? याकडेच तिच्या चाहत्यांचं लक्ष असेल.