बंगळुरु : आयपीएलच्या नवव्या सिझनची चॅम्पियन सनरायजर्स हैदराबाद ठरली आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा आठ रननी पराभव केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादनं आपल्या 20 ओव्हरमध्ये तब्बल 208 रनचा डोंगर उभा केला. हैदराबादकडून वॉर्नरनं 38 बॉलमध्ये 69 रन केल्या. वॉर्नरच्या या इनिंगमध्ये 8 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर युवराज सिंगनं 23 बॉलमध्ये 38 रन केल्या.


हैदराबादला 200 चा टप्पा पार करून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ती बेन कटिंगनं. कटिंगनं 15 बॉलमध्ये नाबाद 39 रन केल्या. कटिंगच्या या इनिंगमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. 


209 रनचा पाठलाग करायला आलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली. 10 ओव्हरमध्येच 110 रनचा टप्पा पार केला. पण 38 बॉलमध्ये 76 रन करून गेल आऊट झाला. त्यानंतर मात्र आरसीबीच्या विकेट जात राहिल्या. 


यंदाच्या आयपीएलमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीनं या मॅचमध्येही चांगली कामगिरी केली. कोहलीनं 35 बॉलमध्ये 54 रन केल्या. पण कोहलीला आरसीबीला फायनल मात्र जिंकवून देता आली नाही.