जेतेपद मिळवल्यानंतर हैदराबाद संघावर बक्षिसांचा वर्षाव
डेविड वॉर्नरच्या झंझावाती खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या अंतिम फेरीत विराटच्या बंगळूरुला नमवत जेतेपद उंचावले. या सामन्यात हैदराबादने आठ धावांनी विजय मिळवलाय.
मुंबई : डेविड वॉर्नरच्या झंझावाती खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या अंतिम फेरीत विराटच्या बंगळूरुला नमवत जेतेपद उंचावले. या सामन्यात हैदराबादने आठ धावांनी विजय मिळवलाय.
या विजयानंतर जेतेपद मिळवलेल्या हैदराबाद संघाला १५ कोटींचे बक्षिस देण्यात आले. तर उपविजेता ठरलेल्या बंगळूरु संघाला १० कोटींचे बक्षिस देण्यात आले.
सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरात लायन्स हा संघ तिसऱ्या स्थानी राहिला. या संघाला ७.५ कोटींचे बक्षिस देण्यात आले. चौथ्या स्थानी राहिलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला ७.५ कोटींचे बक्षिस देण्यात आले.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या विराटला ऑरेंज कॅप देण्यात आली. विराटला १० लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले. तर हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने पर्पल कॅपचा मान मिळवला. त्यालाही १० लाखांचे बक्षिस देण्यात आले. अंतिम सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बेन कटिंगला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याला पाच लाखांचे बक्षिस देण्यात आले.