हे 10 बॅट्समन ठरवतील वर्ल्ड कपचं यश
टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. यंदाचा हा वर्ल्ड कप भारतामध्ये होत असल्यानं क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मुंबई: टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. यंदाचा हा वर्ल्ड कप भारतामध्ये होत असल्यानं क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टी-20 म्हणजे बॅट्समनचा फॉरमॅट असं समिकरणच बनलं आहे, त्यामुळे या वर्ल्ड कप मध्ये बॅट्समन यशस्वी झाले, तर ही स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल. असे कोणते बॅट्समन ही स्पर्धा यशस्वी करु शकतात त्यावर एक नजर टाकूयात.
विराट कोहली
टेस्ट, वनडे किंवा टी-20 सगळ्याच फॉरमॅटमध्ये सध्या विराट कोहली जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. आत्ताच्या घडीला विराट हाच जगातला सर्वोत्तम बॅट्समन असल्याचं म्हंटलं तर ते चूक ठरणार नाही. 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोहली मॅन ऑफ द टुर्नामेंट होता. यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही कोहलीनं तशीच कामगिरी केली तर भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
ख्रिस गेल
जगभरातला सगळ्यात स्फोटक बॅट्समन म्हणजे ख्रिस गेल. मनात येईल तेव्हा सिक्स मारणारा ख्रिस गेल कोणतीही मॅच एक हाती फिरवू शकतो. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर वेस्ट इंडिज टीमचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
एबी डिव्हिलियर्स
क्रिकेटमधले कोणतेही शॉट्स खेळणं एबी डिव्हिलियर्सला कठीण नाही, हे त्यानं वारंवार दाखवून दिलं आहे. सध्या डिव्हिलियर्स चांगल्या फॉर्ममध्ये नसला तरी त्याची बॅटिंग बघण्यासाठी अनेक क्रिकेट फॅन्स उत्सुक असतील हे मात्र नक्की.
स्टिव्ह स्मिथ
टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाला आत्तापर्यंत फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. यंदा मात्र हा डाग पुसण्यासाठी ऑस्ट्रेलियाची टीम मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाच्या यशासाठी स्टिव्ह स्मिथचा फॉर्म महत्त्वाचा असेल.
जॉस बटलर
इंग्लंडचा विकेटकिपर जॉस बटलरकडे एक हाती मॅच फिरवण्याची ताकद आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही बटलर फॉर्ममध्ये होता. त्यामुळे वर्ल्ड कपमध्येही बटलर असाच फॉर्ममध्ये राहिल अशी अपेक्षा इंग्लंडची आहे.
रोहित शर्मा
भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मावर भारताची भिस्त अवलंबून असेल. ओपनिंगला येत असल्यामुळे रोहित शर्माला सुरवातीपासूनच आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे.
डेव्हिड मिलर
दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरनं आयपीएलमध्ये खोऱ्यानं रन काढल्या आहेत. त्यातच आता वर्ल्ड कप भारतात होत असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडून खेळतानाही मिलर अशाच रन करेल, अशी अपेक्षा दक्षिण आफ्रिकेच्या टीमची असेल.
कोरे अंडरसन
ब्रॅन्डन मॅक्कलमच्या निवृत्तीमुळे न्यूझिलंडच्या टीममध्ये पोकळी निर्माण झाली आहे. मॅक्कलमसारखी आक्रमकता दाखवण्याची जबाबदारी आता कोरे अंडरसनवर असेल. अगदी सहज सिक्स मारून मॅच पलटवण्याची क्षमता अंडरसनकडे आहे.
शाहिद आफ्रिदी
विस्फोटक बॅट्समन म्हणून करियरची सुरुवात करणारा शाहिद आफ्रिदी बॉलिंगमुळेच पाकिस्तानला जास्त मॅच जिंकवून देतो. प्रत्येक बॉल अगदी सहज ग्राऊंडच्या बाहेर घालवण्याची क्षमता असलेला आफ्रिदी चालला तर मात्र विरोधी टीमचं काही खरं नाही.
तिलकरत्ने दिलशान
श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानचा कदाचित हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. मोठमोठ्या सिक्स मारणारा अशी दिलशानची ओळख नसली तरी दिलस्कूपसारखे वेगवेगळे शॉट्स मारून त्यानं आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे.