नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिक सुरु झाल्यानंतर भारताच्या खात्यात अद्याप एकाही पदकाचा समावेश झालेला नाहीये. त्यामुळे ऑलिंपिक खेळाडूंवर टीका केली जातेय. मात्र भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचे समर्थन करताना विराट म्हणाला, दुसऱ्या देशांच्या तुलनेत चांगल्या सुविधा मिळत नसतानाही ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी ते जीवतोड मेहनत करतायत. 


हे खेळाडू तिथे जातात आणि आपले शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतात. काही खेळांडूकडे तर दुसऱ्या देशांच्या खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधेच्या तुलनेत १० टक्केही सुविधा मिळत नाहीत. मात्र त्यानंतरही ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात. टीकाकार मात्र आपल्या देशात बसून त्यांची तुलना करत बसतात, अशा शब्दात विराटने टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला. 


काही दिवसांपूर्वीच लेखिका शोभा डे यांनी ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करणारे ट्विट केले होते. भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये केवळ सेल्फी काढण्यासाठी जात असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या ट्विटनंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली.