आरसीबीकडून खेळणारा चहाल आधी काय करायचा ?
यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरला फायनलमध्ये पोहोचवण्यात मोठं योगदान विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सनं बजावलं.
बंगळुरु : यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरला फायनलमध्ये पोहोचवण्यात मोठं योगदान विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सनं बजावलं. पण या दोघांबरोबरच आरसीबीच्या युझुवेंद्र चहालनं यंदाच्या मोसमात घेतलेल्या 20 विकेटमुळे आरसीबीला कमबॅक करता आला.
आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन मॅचमध्ये चहालनं 11 च्या इकोनॉमीनं 6.1 ओव्हरमध्ये तब्बल 66 रन दिल्या होत्या. या दोन मॅचमध्ये त्याला फक्त दोन विकेट घेण्यात यश आलं होतं.
या खराब कामगिरीमुळे चहालला पुढच्या डच्चू देण्यात आला. पण सहाव्या मॅचपासून मात्र चहालची कामगिरी सुधारली आणि आरसीबी फायनलमध्ये पोहोचलीच पण चहालही यंदाच्या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. यामुळे चहालची भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यामध्येही निवड झाली.
पण क्रिकेटआधी चहालनं बुद्धीबळामध्येही यश मिळवलं आहे. चहालनं अंडर 12 च्या बुद्धीबळ स्पर्धांमध्ये भारताचंही प्रतिनिधीत्व केलं आहे. ग्रीसमधली वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियनशीप, कोझिकोडमध्ये झालेली एशियन यूथ चेस चॅम्पियनशीपमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. 2003मध्ये चहाल 11 वर्षांचा असताना तो भारताकडून बुद्धीबळ खेळला होता.
टी 20 क्रिकेटमध्ये रणनिती आखताना डोक्याचा जास्त विचार करावा लागतो, त्यामुळे बुद्धीबळाचा मला क्रिकेटमध्येही उपयोग होतो, असं चहाल म्हणाला आहे. हरियाणाच्या जिंदमधलं चहाल कुटुंब मध्यमवर्गीय आहे. बुद्धीबळाच्या खेळासाठी लागणारा पैसा आणि कोच मिळत नसल्यानं युझुवेंद्रनं बुद्धीबळ सोडल्याची प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली आहे.