मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात महत्त्वाचं स्थान असणाऱ्या ठाकरे घराण्याने आता निसर्गातही आपलं नाव कोरलंय असं म्हणायला हवं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे याने नव्याने शोधलेल्या खेकड्याच्या एका प्रजातीला ठाकऱ्यांचं नाव दिलंय. तशी माहिती त्याने फेसबूकवर टाकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्गाची आवड असणारा १९ वर्षांचा तेजस सापाची एक दुर्मिळ प्रजाती शोधण्यासाठी कोकणातल्या सावंतवाडीला गेला होता. पण, सापाचा शोध घेता घेता त्याच्या नजरेला एक वेगळ्याच प्रजातीचा खेकडा दिसला. लाल रंगाचे कवच असणारा आणि पिवळ्या रंगाच्या नांगी असणारा हा खेकडा होता.


तेजसने या प्रजातीचा शोध लावल्याने त्याला या प्रजातीच्या खेकड्याचे नामकरण करण्याचा अधिकार मिळाला. 'गुबरनॅटोरियाना रुबरा' असे नाव त्याने सुरुवातीस सुचवले. पण, नंतर त्याचे मार्गदर्शक आणि झूऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे एस के पती यांनी मात्र त्या खेकड्याचे नामकरण 'गुबरनॅटोरियाना ठाकरेयी' असे केले. ज्याने खेकड्याचा शोध लावला त्याचे नाव या खेकड्याच्या प्रजातीला दिले जावे म्हणूनच त्यांनी असे केल्याचे तेजसने म्हटले आहे.


या गटाने सह्याद्रीच्या घाटांमध्ये गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या एकूण पाच नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. या प्रजातींची माहिती 'झूटाक्सा' या आंतरराष्ट्रीय प्राणीशास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंनी फेसबूकवरही यासंबंधीची पोस्ट शेअर केली आहे.