गूगलच्या सीईओंना ७ वर्षाच्या बालिकेचे पत्र
गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना एका ७ वर्षाच्या बालिकेने पत्र लिहिलं आहे, हे पत्र तिने गूगलमध्ये नोकरी करण्याची संधी मिळावी म्हणून लिहिलं आहे.
न्यूयॉर्क : गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना एका ७ वर्षाच्या बालिकेने पत्र लिहिलं आहे, हे पत्र तिने गूगलमध्ये नोकरी करण्याची संधी मिळावी म्हणून लिहिलं आहे. विशेष म्हणजे गूगलचे सीईओ कोण आहेत हे तिला माहित नसल्याने तिने, पत्र लिहितांना डिअर गूगल बॉस असा शब्द वापरला आहे.
क्लोच्या वडिलांना सुंदर पिचाईंनी दिलेला प्रतिसाद ‘लिंक्डइन’वर शेअर केला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पत्रात ७ वर्षाच्या मुलीला म्हणजेच क्लोला कॉम्प्युटर, रोबो आणि किंडलची चांगली आवड असल्याचं तिने म्हटलं आहे. विशेष म्हणजे गुगल ऑफिसमध्ये फोटो अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात, यातील बीन बॅग्ज, स्लाईडस आणि गोकार्टस या मुलीला आकर्षित करतात, हे तिने लिहिलेल्या पत्रावरून लक्षात येतं.
या पत्राला उत्तर देताना सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे, तुला कॉम्प्युटर आवडतो हे वाचून आनंद झाला, बेटा तू अशीच मेहनत घेत राहिलीस तर तुझी स्वप्न पूर्ण होतील. अगदी गुगलमध्ये नोकरी करण्यापासून ऑलिम्पिकमध्ये स्विमिंग करण्याची सर्व स्वप्न तुझी पूर्ण होतील. तुझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुझ्या नोकरीचा अर्ज पाहण्यास मी उत्सुक असेल, तुला हार्दिक शुभेच्छा, असं सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे.