पुणे : शुल्क नियामक प्राधिकरणाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांकरता 2017-2018 साठी शुल्क निश्चिती करण्यात आली असून, यामध्ये अनेक महाविद्यालायांच्या शुल्कामध्ये तब्बल 25 ते 65 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. एवढंच नाही तर शुल्कात कपात झालेल्या महाविद्यालयांना आधी घेतलेल्या जादा फीचा परतावाही विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुल्क नियामक प्राधिकरणाच्या वतीनं गेल्या वर्षभरामध्ये खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतली विद्यार्थी संख्या आणि खर्चाचा तपशील याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार ही शुल्क कपात करण्यात आली असून, राज्यातल्या पाचशेहून अधिक तर एकट्या पुण्यातील शंभरहून अधिक महाविद्यालयांचा यात समावेश आहे. 


- वडाळातील विद्यालंकार इन्स्टिट्यूटची ME ची फी १,२६,००० वरुन ५१,५०० केली.
- डोंबिवलीतील एस एच जोंधळे कॉलेजची फी ७५ हजारावरुन ४६ हजारवर 
- पुण्यातील भारती विद्यापीठाच्या नेहरु पॉलिटेक्निकची फी ६३,७०० वरुन ३० हजारावर 
- कोल्हापूरच्या डॉ डी वाय पाटील  इंजिनिअरिंग कॉलेजची फी ५६,००० वरुन ३०,००० वर 
- परभणीतील शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या MBA ची फी ७४,००० वरुन २८,००० वर 
- वर्धातील दत्ता मेघे पॉलिटेक्निकची फी ४२,००० वरुन २३,५०० 
- www.sssamiti.com या वेबसाईटवर विद्यार्थी सुधारीत शुल्क पाहू शकतात.


या प्रकरणी शुल्क नियामक प्राधिकरणाबरोबर पत्रव्यवहार सुरु असून, कमी झालेलं शुल्क पुन्हा वाढेल अशी आशा काही महाविद्यालयांनी व्यक्त केली आहे.


खासगी महाविद्यालयांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2015 मध्ये शुल्क नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. शुल्क वाढीसाठी महाविद्यालयांनी बोगस विद्यार्थी, अतिरिक्त खर्च आणि सुविधांच्या नावाखाली ज्यादा फी आकारल्याचं प्राधिकरणानं घेतलेल्या आढाव्यात उघड झालं. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय. त्यामुळे पालक आणि विद्यार्थीवर्गाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे.