राज्यातील बहुतांश एटीएम आज बंद राहतील
एटीएम यंत्रणा अपडेट करण्याच्या सूचना, रिझर्व्ह बँकेनं सर्वच बँकांना दिल्या आहेत.
मुंबई : राज्यातील बहुतांश एटीएम आज काही काळासाठी बंद राहतील. कारण जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या 'वॉन्ना क्राय' या रॅनसमवेअरच्या हल्ल्यापासून बचावासाठी, एटीएम यंत्रणा अपडेट करण्याच्या सूचना, रिझर्व्ह बँकेनं सर्वच बँकांना दिल्या आहेत.
दहा वर्षांतील सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यामुळे एटीएमची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच ‘वॉन्नाक्राय’ हा रॅनसमवेअरमुळे दीडशेपेक्षा जास्त देशांतील २ लाखांहून अधिक कम्प्युटर यंत्रणांवर परिणाम झाला आहे.
या रॅनसमवेअरकडून 'विंडोज एक्सपी' या ऑपरेटिंग सिस्टीमला लक्ष्य करण्यात येत आहे. भारतातील ७० टक्के एटीएममध्ये हीच यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे हे सॉफ्टवेअर अपडेट करून घेणे आवश्यक आहे.
हा धोका ओळखून रिझर्व्ह बँकेनं सर्व संबंधित बँकांना एटीएम यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्यात. मोठ्या संकटापासून वाचण्यासाठी सहकार्याचं आवाहन बँकांनी केलं आहे. या कामासाठी बऱ्याच बँकांची एटीएम बंद राहणार आहेत. त्यामुळे जनतेची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मात्र एवढ्या मोठ्या संकटासमोर हा त्रास तसा फारसा नाही.